आरटीआय न्युज स्पेशल

भर पावसात पालकमंत्री पूरपीडितांच्या भेटीला!

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

पोंभुर्णा तालुक्यातील चार गावांना प्रत्यक्ष भेट

नुकसानाचे पंचनामे अतिशय गांभिर्याने करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 26 : आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात पूरपीडितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले. लागोपाठ दोन दिवस भर पावसात त्यांनी पूरपीडितांच्या भेटी घेतल्या. पूरपीडितांच्या समस्या एकून घेतल्या.

पूरग्रस्त चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरूवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यातील चार पूरगस्त गावांमध्ये पोहचले. पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव , वेळवा, आष्टा आणि बल्लारपूर (चेक) या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, तहसीलदार शिवाजी कदम, लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंता प्रियंका रायपूरे, सा.बा. विभागाचे अभियंता  मेंढे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश देवतळे, अल्का आत्राम, सुलभा पीपरे, अजित मंगळगिरीवार, राहुल संतोषवार, विनोद देशमुख, हरीश ढवस आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक यांनी अतिशय गांभिर्याने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत. यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ देऊ नये. तसेच कोणत्या गावात कधी पंचनामे होणार आहेत, याबाबतचे वेळापत्रक तहसीलदारांनी गावकरी व पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. नुकसानाच्या पंचनाम्यातून एकही जण सुटता कामा नये. यासाठी ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिकरित्या पंचनाम्याची यादी वाचून दाखवावी, असे स्पष्ट निर्देश  मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. तालुक्यातील ज्या गावात अतिवृष्टी झाली, शेती पूर्णपणे बुडाली, संपर्क तुटला अशा सर्व गावांची यादी प्रशासनाकडे सादर करावी. जेणेकरून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

               बंद रस्त्यांची यादी द्या

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 11 रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यामुळे सदर रस्ते पूर्णपणे बंद पडले. अशा रस्त्यांची यादी सादर करावी. पावसामुळे रस्ते बंद होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या पुलाची निर्मिती होऊ शकते का, याबाबत नियोजन करावे.  तसेच काही ठिकाणी पुलांची उंची वाढविण्यासंदर्भात बांधकाम विभागाने अहवाल व अंदाजपत्रक सादर करावे, अश्या सूचना  मुनगंटीवार यांनी दिल्या. अतिवृष्टीमुळे शाळांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्याही दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

        तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम

 

तालुक्यातील तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम पाटबंधारे विभागाने हाती घ्यावा. तसेच सर्व तलावांची यादी करून प्रत्येक तलावाचे त्याचे स्वतंत्र टीपण तयार करावे. शेतरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी 15 दिवसांचा कार्यक्रम तयार करावा. अतिवृष्टीमुळे विद्युत खांब क्षतीग्रस्त झाले असून तारा तुटल्या आहेत. त्यामुळे विद्युत विभागाने तातडीने सर्व्हे करून प्रशासनाला अहवाल सादर करावा. यावेळी देवाडा–खेरगाव टेकडीच्या बाजुला असलेला पूल उंच करणे, जाम-तुकुम नाला खोलीकरण करणे, देवाडा खुर्द येथील नाला खोलीकरण करणे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

जखमी झालेले तसेच घरांचे नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत

 

पुरामुळे घरांचे नुकसान होऊन जखमी झालेल्या नागरिकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यात आकाश मेश्राम, पौर्णिमा मेश्राम, अविनाश मेश्राम, चंदू सिडाम आणि निवृत्ती कन्नाके यांना प्रत्येकी 5400 रुपये मदत करण्यात आली. तसेच घरांचे नुकसान झालेल्या चेक बल्लारपूर येथील रवींद्र पिंपळशेंडे, वामन पिंपळशेंडे, शालिक कुळसंगे आणि संतोष मत्ते यांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत देण्यात आली.

पोंभूर्णा तालुक्यात पावसामुळे झालेले नुकसान 

पोंभूर्णा तालुक्यात पावसामुळे अंदाजे प्राथमिक नुकसान 2130 हेक्टर असून बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2850 आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. पावसामुळे तालुक्यात एकूण बाधीत कुटुंबे 23 आहे. अंशतः नुकसान झालेल्या कच्ची घरांची संख्या 89 असून पक्की घरे 4 आहेत. तसेच नष्ट झालेल्या गोठ्यांची संख्या 5 आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्के व कच्ची घरांची संख्या 2 आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker